५ नोव्हेंबरला साजरा होणाऱ्या मराठी रंगभूमी दिनाविषयी कलावंतांमध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळते. रंगकर्मीच्या मनात रंगभूमीबद्दल नितांत आदर, श्रद्धा असतेच; पण त्याचवेळी रंगभूमी दिनाच्यानिमित्ताने जर एखादी कलाकृती परदेशात सादर करण्याची संधी मिळाली तर त्याचा आनंद निश्चितच वेगळा म्हणावा लागेल. असाच दुर्मिळ योग हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांच्याबाबतीत जुळून आलाय. येत्या ५ नोव्हेंबरला रंगभूमी दिन साजरा करायला विजय कदम यांना थेट ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाकडून खास निमंत्रण लाभलं असून प्रेक्षकांना मनमुराद हसवायला ते ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत.
ऑस्ट्रेलियात प्रथमच साजऱ्या होणाऱ्या रंगभूमी दिनाचे औचित्य साधत अभिनेते विजय कदम यांच्या गाजलेल्या ‘खुमखुमी’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विशेष म्हणजे विजय कदम यांच्यासोबत तेथील १८ स्थानिक गुणी कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलियात मराठी रंगभूमी दिन साजरा करण्याचा बहुमान ब्रिस्बेनच्या महाराष्ट्र मंडळाला मिळाला असून त्यात गेली ४२ वर्षे रंगभूमीची सेवा करणारे रंगकर्मी व चतुरस्त्र अभिनेते विजय कदम यांना सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष भूषण जोशी आणि डॉ. अमोल देशमुख व इतर पदाधिकारी उत्साहाने रंगभूमी दिनाच्या तयारीला लागले आहेत.